खगोलशास्त्र/खगोलभौतिकी विषयात करिअर!!
जवळ १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन क्षेत्रात असलेल्या भागीदारीचा टक्का प्रत्यक्षरित्या निराशाजनक आहे. ट्रेडींग इकॅानोमिक्स या वर्ल्ड बॅंकेच्या २०१८ च्या सर्वेक्षणानुसार भारत देश हा आपल्या एकूण राष्ट्रीय दरडोई उत्पन्नापैकी ०.५४९ टक्के इतकीच गुंतवणूक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनात करतो, ही आकडेवारी गेल्या दशकातील सर्वात निम्नतम आहे, असे या सर्वेक्षणात म्हटलेले आहे, पण जागतिक पातळीवर संशोधनात विशेषत: मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय भागीदारी ही काळानूसार वाढत असल्यामुळे भारतासारख्या विकसनशील आणि तरुण देशात संशोधन वृत्ती येत्या काळात वाढणार आहे हे नक्की! मूलभूत विज्ञानात संशोधन हा प्रकार आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासात नवीन नाही. नोबेल पारितोषिक विजेत्यांची आपल्या देशात वानवा असली तरी सर सी.व्ही रामन, सुब्रमण्यम चंद्रशेखर, मेघनाथ साहा, सत्येंद्रनाथ बोस, वेंकटरमन रामकृष्णन यांसारख्या विभूतींनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.
मूलभूत विज्ञान क्षेत्रात करीअर करणा-या भरपूर संधी या २१ व्या शतकातील पुढील काळात उपलब्ध होणार आहेत. यात विशेषत: नवतरुणांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, नॅनोतंत्रज्ञान, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र, विदाविज्ञान (डेटा सायन्स) या विज्ञानशाखांमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारीत संशोधक म्हणून काम करण्याच्या विशेष संध्या उपलब्ध आहेत. यापैकी खगोलशास्त्र/खगोलभौतिकी या विज्ञानशाखेत कोणकोणत्या प्रकारच्या करीअरच्या संधी उपलब्ध असतात याबद्दल जरा मी चर्चा करणार आहे.
खगोलशास्त्र/खगोलभौतिकी या विज्ञानशाखेच्या विषयाची व्याप्ती ही आज अतिशय मोठी असल्यामुळे भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, जीवशास्त्र तसेच माहिती तंत्रज्ञान या विषयातील पदवीधरही या विषयाच्या विविध उपशाखांमध्ये काम करु शकतात.
खगोलशास्त्र या विषयाचा इतिहास अतिशय पुरातन काळापासून सुरु झालेला असून त्यातील संशोधनाच्या प्रक्रियापद्धतीत काळानुसार बदल होत आला आहे. आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांपासून ते आकाशगंगा, दीर्घिका तसेच अफाट पसरलेले अमर्याद विश्व यांसारख्या वस्तूंचा शास्त्रीय अभ्यास खगोल शास्त्रात केला जातो. या खगोलशास्त्र विषयाचा व्यावसायिक पातळीवरचा अभ्यास हा १९ व्या शतकापासून सुरु झाला होता. सुरुवातीला फक्त आकाशातील ग्रह-तारे यांच्या वर्षानुवर्षे फक्त उघड्या डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणांपासून ते विविध प्रकारच्या अत्याधुनिक दुर्बिणी आणि वेधशाळा यांद्वारे विश्वाचा घेतलेला शोध, अशा या विषयातील शोधमालिकांचा प्रवास आहे. त्यामुळे नवसंशोधकांसाठी खगोलशास्त्र हा कुतुहलात्मक विषय आहे.
सध्याच्या २१ व्या शतकात खगोलशास्त्र हे दोन भागात वर्गीकृत होते. एक म्हणजे सैद्धांतिक खगोलशास्त्र/खगोलभौतिकी(Theoretical Astronomy and Astrophysics) आणि दुसरे म्हणजे निरीक्षणात्मक किंवा प्रायोगिक खगोलशास्त्र(Observational or Experimental Astronomy)! खगोलशास्त्र हे या दोन वर्गात विभागले गेले असले तरी या दोन्ही वर्गात काम करणारे शास्त्रज्ञ आणि अभियंते हे परस्पर भागीदारीने काम करत असतात. आता या दोन क्षेत्रांत भारतात आणि जागतिक पातळीवर कोणत्या संधी आहेत या बद्दल विचार करुया.
सैद्धांतिक खगोलशास्त्र/खगोलभौतिकी:
ही खगोलशास्त्राची शाखा अतिशय कमी खर्चिक आहे. यांत गणिती समीकरणे, संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान/विदा विज्ञान, संगणक सॉफ्टवेअर आणि सिम्युलेशन्स यांमार्फत विश्वाची उत्पत्ती, विश्वातील विविध भौतिक रहस्ये, कोडी, विश्वाची भूमिती तसेच विश्वाचे भवितव्य काय असेल यांसारख्या प्रश्नांवर संशोधन केले जाते. भौतिकशास्त्रातील सापेक्षता, स्ट्रींग थिअरी(तंतू सिद्धांत), क्वांटम ग्रॅव्हीटी(पूंज गुरुत्वबल), क्वांटम फिल्ड थिअरी(पूंज क्षेत्र सिद्धांत) यांसारख्या विषयांचा अभ्यास सुद्धा सैद्धांतिक खगोलशास्त्रात केला जातो. या विषयात संशोधनाची पद्धत ही वैयक्तिक आणि सामुहीक अशा दोन्ही स्वरुपाची असू शकते.
गणित, भौतिकशास्त्र तसेच माहिती तंत्रज्ञान या विषयांतील पदवीधर सैद्धांतिक खगोलशास्त्रात करीअर घडवू शकतात.
व्यावसायिक पातळीवर या विषयात अध्ययन करण्यासाठी सध्या भारतात काही संस्था खालीलप्रमाणे आहेत:
टि.आय.एफ.आर (TIFR) , मुंबई
आयुका (IUCAA), पुणे
वरील संशोधन संस्थांतील प्रवेशासाठी त्यांची स्वत: ची स्वतंत्र प्रवेशपरीक्षा असते. TIFR साठी ‘TIFR - GS’ तर आयुकासाठी ‘INAT’ ह्या प्रवेश परीक्षा आहेत. तसेच या सर्व संस्थांसाठी एकमेव अशी प्रवेशपरीक्षासुद्धा आहे ती म्हणजे JEST (Joint Entrance Screening Test) , ही परीक्षा भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञान या दोन्ही विषयात देता येते. या परिक्षेत अपेक्षित गुण मिळवल्यावर मुलाखत देऊन उपलब्ध विषयांत पीएच्.डी साठी प्रवेश घेता येतो.
निरीक्षणात्मक किंवा प्रायोगिक खगोलशास्त्र:
ही खगोलशास्त्राची सर्वव्याप्त शाखा आहे ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणकशास्त्र, अभियांत्रिकी या विषयांतील पदवीधर करिअर घडवू शकतात.
निरीक्षणात्मक/प्रायोगिक खगोलशास्त्रही त्याच्या शास्त्रीय व्याप्तीमुळे इतर विषयांमध्ये वर्गीकृत होते. भारतात तसेच जगात इतर ठिकाणी असलेल्या विविध वेधशाळा, महाकाय दुर्बिणी यांमध्ये संशोधन करण्याची इच्छा असलेल्या संशोधकास गणित, संगणक सॅाफ्टवेअर्स तसेच विदा विज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
निरिक्षणात्मक/प्रायोगिक खगोलशास्त्राचा विस्तार भारताप्रमाणेच इतर जगात अतिशय वाढलेले आहे. जगात आंतरराष्ट्रीय सहकार्यातून महाकाय दूर्बिणी आणि वेधशाळा बांधल्या जात आहेत.भारतात या क्षेत्रात आपल्या करिअरची सुरवात करण्यासाठी खालील संस्था आहेत.
फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीज् (PRL), अहमदाबाद :
इस्त्रोच्या अखत्यारीत असलेली ही संस्था विशेषत: भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रातील संशोधनाला प्राधान्य देते. यात प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी (National Eligibility Test) - भौतिकशास्त्र तसेच GATE (भौतिकशास्त्र) यांसारख्या परीक्षांत पात्र व्हावे लागते.
वरील राष्ट्रीय संस्थांव्यतिरिक्त भारतात विविध ठिकाणी दुर्बिणी आणि वेधशाळा यांची उभारणी केली आहे.
TIFR च्या अंतर्गत असलेली NCRA (National Centre for Radio Astrophysics) ही संस्था पुणे येथे नारायणगाव जवळ GMRT (Giant meter wave Radio Telescope) ही रेडिओ वेधशाळा आंतरराष्ट्रीय सहकार्यातून चालवते. या रेडिओ खगोलशास्त्र विषयात विद्यूत आणि दूरसंचार अभियांत्रिकी( Electronics and Telecommunication Engineering) आणि संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) या विषयांतील पदवीधरांसाठी विशेष संधी उपलब्ध आहेत.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ARIES (Aryabhatta Research Institute of Observational Sciences), नैनीताल ही संस्था प्रायोगिक/निरीक्षणात्मक खगोलशास्त्रीय संशोधनात अग्रेसर आहे. तसेच या विभागाअंतर्गत इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रॅाफिजीक्स् (IIA)- बंगळूर या संस्थेमार्फत वेणू पप्पू वेधशाळा-चेन्नई, कोडाईकनाल सौरवेधशाळा तसेच लडाख येथील हानले वेधशाळा या दुर्बिणी चालवल्या जातात.
या वरील संस्थांमध्ये पीएच्.डी आणि इन्टिग्रेटेड पीएच्.डी च्या संधी उपलब्ध आहेत. या वरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी GATE, JEST आणि NET या परिक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. वरील प्रत्येक संस्थांची प्रवेश प्रक्रिया आणि मुलाखती संशोधनविषयांच्या उपलब्धतेनुसार वेगवेगळी असू शकतात. याविषयीची अधिक माहिती या संस्थांच्या स्वतंत्र संकेतस्थळांवर मिळू शकेल.



Good and informative article.
ReplyDelete